तुम्हाला आयुष्यात जिंकायचे आहे काय?काही तरी मोठं करून दाखवायचं आहे का?
पण काय करायचं ते कळत नाही?
कुठे चुकतंय ते लक्षात येत नाही?
वरील पैकी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर जर हो असे असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.
हा ब्लॉग संपूर्ण वाचून त्यातल्या आयडिया तुम्ही जर दैनंदिन आयुष्यात उतरवल्या तर नक्कीच तुमच्या मानसिकतेत अमूलाग्र बदल होईल; याबद्दल मला अजिबात शंका नाही.
मी केतन गावंड, ऑनलाईन स्वराज्य सारथी, मी मिलेनिअर माईंड घडवतो, ज्याच्या मदतीने येत्या ३ वर्षात १००००० उद्योजकांना वेळेचे, पैश्याचे आणि निवडीचे स्वातंत्र्य मिळवून देणे, हा माझा ध्यास आहे.
या पहिल्या भागात आपण अश्या काही मानसिकता बघणार आहोत; ज्या प्रामुख्याने आपल्याला यशस्वी असणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळतात.
चला तर मग सुरुवात करुया,
१) स्वतंत्र (Independent):
ज्यांची जिंकण्याची मानसिकता आहे त्यांच्याकडे ही सगळ्यात पहिली क्वालीटी आपल्याला पाहायला मिळते.'ऐकावे जनाचे करावे मनाचे' हे आपण नेहमी ऐकतो, पण खरंच आपण आपल्या मनासारखं जगतो का?
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आपल्या जवळची लोकं, आपले सहकारी, न्यूज चैनल, सोशल मीडिया या सगळ्यांचा आपल्या मानसिकतेवर नको तेवढा प्रभाव पडत असतो. ह्या सगळ्या गोंगाटात आपण आपली स्वतंत्र मानसिकता नक्की जपतोय का? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारायला हवा.
आजूबाजूच्या या गर्दीत तुमचा आतला आवाज हरवून जाणार नाही याची काळजी घ्या.
पाच-दहा वर्षानंतर आपण जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते की, त्या वेळी मी जे ठरवलेलं ते मी करायला हवं होतं आणि कदाचित इतरांच्या मतांना, विचारांना मी एवढं जास्त महत्त्व दिलं की मला जे करायचं होतं ते राहूनच गेलं.
माझ्या एका भावाने सहज उच्चारलेलं वाक्य इथे अगदी समर्पक वाटत आहे.
तो म्हणाला की, "दहा वर्षांपूर्वी जे मला माहीत होतं, मी जर त्याला चिकटून राहिलो असतो आणि त्याच्यावर काम केलं असतं, तर आज मला पुढची पन्नास वर्षे काम करायची गरज नव्हती."
आपल्या बाबतीत देखील हे सत्य आहे का ते स्वतःला विचारून बघा.
- खरंच तुम्ही रोज थोडावेळ काढून स्वतःच्या अंतर्मनात डोकावत आहात का?
-तुमचे अंतर्मन तुम्हाला जे करायला सांगते ते तुम्ही करताय का?
-स्वतःच्या मतांना इतरांच्या गोंगाटा पेक्षा जास्त महत्त्व देत आहे का?
-तुमचं वैचारिक स्वातंत्र्य तुम्हीं जपलंय का?
हे प्रश्नच तुम्हाला तुमच्या जवळ वैचारिक स्वातंत्र्य आहे कि नाही याची जाणीव करून देतील .
२) ध्येयवादी- (Goal oriented):
जेव्हा पोहोचायचं कुठे हे स्पष्ट असतं, तेव्हा आपोआपच निर्णय घेतले जातात. जिंकण्याची मानसिकता असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ही एक जबरदस्त इच्छाशक्ती पाहायला मिळते.
-मला नक्की काय करायचे आहे?
-माझ्या कुटुंबासाठी मी कोणती स्वप्ने बघतो?
-जगामध्ये मला प्रामुख्याने कोणते बदल घडवून आणायचे आहेत?
-मला जिथे पोहोचायचे आहे तिथे पोहोचण्यासाठी स्वतःमध्ये जाणीवपूर्वक कोणते बदल करावे लागतील?
-मला येत्या एका वर्षात, तीन वर्षात, पाच वर्षात, दहा वर्षात नक्की कुठे पोहोचायचे आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तम स्पष्टता धेयाच्या रूपाने या यशस्वी व्यक्तींकडे असते.
प्रत्येक कठीण प्रसंगी तुमच्याकडे दोन पर्याय असतात एक जो तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जातो आणि दुसरा जो तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब घेऊन जातो.
तुमचं ध्येय जर अतिशय स्पष्ट असेल आणि तुमच्या मनावर कोरलेले असेल तर दर वेळेला तुम्ही तोच मार्ग निवडता जो तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने घेवून जातो.
स्वतःला प्रश्न विचारा की, तुम्ही असेच निर्णय घेता का? जे तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात आहेत ?
तुम्ही जे खाता ते तुम्हाला जशी तब्येत हवी आहे त्याच्या दिशेने घेऊन जाईल का?
तुम्ही जे वाचताय किंवा ज्या विचारांना आपल्या डोक्यात जागा देताय, ते विचार तुम्हाला ज्या प्रकारची मानसिकता निर्माण करायची आहे त्या दिशेने घेऊन जात आहेत का?
तुमच्या डोक्यात जी आदर्श नातेसंबंधांची कल्पना आहे, तिथे पोहोचण्याच्या अनुसरूनच तुम्ही वागत आहात की तुम्ही विचार काहीतरी वेगळा करताय आणि कृती काहीतरी भलतंच दर्शवते आहे?
ज्या कौशल्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता ते कौशल्य मिळवण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक रोज सातत्याने काही ना काही करत आहात का?
वरील प्रश्न तुम्हाला जाणीव करून देतील की, खरंच तुम्ही एक ध्येयवादी आयुष्य जगताय की एक भटके आयुष्य जगत आहात, ज्याला काही दिशाच नाही.
३). जबाबदार (Responsible):
जिंकणाऱ्या व्यक्तीची नेहमीच१००% जबाबदारी घेण्याची तयारी असते.
जेव्हापण आपण प्रत्येक गोष्टीची १००% जवाबदारी घेतो, त्यावेळी आपण दुसऱ्यांना आपल्या अपयशासाठी कारणीभूत ठरवत नाही. कळत-नकळत अगदी सहजतेने आपण आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडत असतो. जर मी वेळेवर पोहोचलो तर मी वेळेवर आलो, पण जर उशीर झाला तर रिक्षा मिळाली नाही, बस लेट आली, गाडी पंक्चर झाली, अशी अनेक कारणं आपण लगेच देऊन मोकळे होतो.
यश माझ्या कृतीवर; तर अपयश हे नेहमी बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून असते, अशी मानसिकता असणारे बऱ्याच वेळेला आयुष्यात मोठी प्रगती करू शकत नाही. जोपर्यंत आपण इतरांना आपल्या अपयशासाठी जबाबदार धरतो, तोपर्यंत एक गोष्ट नक्की; की आपण आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल हा इतरांच्या हातात दिलेला आहे. जोपर्यंत माझा बॉस बदलत नाही, जोपर्यंत माझा लाईफ पार्टनर बदलत नाही, जोपर्यंत माझे मित्र बदलत नाहीत, आई-वडील बदलत नाहीत; तो पर्यंत माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होऊ शकणार नाही, असं म्हणणारी बरीच लोकं मी बघितली आहेत.
काही लोकं तर जोपर्यंत सरकार बदलत नाही, कोरोना पूर्णपणे हद्दपार होत नाही, युक्रेन आणि रशियाचे युद्ध थांबत नाही, तोपर्यंत माझ्या आयुष्यात प्रगती होणार नाही असा देखील विचार करतात.
या सगळ्यांना मी एकच सांगू इच्छितो की; तुम्ही तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल या गोष्टींकडे किंवा व्यक्तीकडे दिलेला आहे ज्यांच्याकडे तुम्ही बोट दाखवत आहात. त्यामुळे जोपर्यंत ते काही वेगळी कृती करत नाहीत तोपर्यंत तुमच्या आयुष्यात बदल घडणार नाही.
तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी माझ्या अपयशाला, नाकर्तेपणाला, चालढकल करण्याच्या वृत्तीला कोणाकोणाला जबाबदार धरतो?
आणि आता पासून स्वतःला सांगायला सुरुवात करा कि; मी माझ्या आयुष्यासाठी, निर्णयांसाठी आणि त्यातून येणाऱ्या परिणामांसाठी १००% जबाबदार आहे.
४). मुबलकता (Abundance):
बऱ्याच वेळेला या मानसिकतेचा आभाव आपल्याला उद्योजकांमध्ये दिसून येतो.
त्याला मिळालं तर, मला मिळणार नाही. एकदा ग्राहक दुसऱ्याकडे गेला की, तो माझ्याकडे पुन्हा कधीच येणार नाही.
आपल्या डोक्यामध्ये असलेल्या छोट्याशा मार्केट मधला छोटासा हिस्सा मिळवण्यासाठी ते वर्षानुवर्षे तडफडत राहतात आणि मग सगळं काही खूप कठीण होऊन बसतं.
कॉम्पिटिशन जीवघेणी आहे.
रेट तोडल्याशिवाय आपण या मार्केटमध्ये तग धरू शकत नाही.
असे वेगवेगळे विचार उद्योजकांच्या मनात येतात आणि तेच त्यांच्या अपयशाला कारणीभूत ठरतात.
मॅनेजमेंट स्ट्रॅटजीमध्ये खूप सुंदर स्ट्रॅटजी सांगितली जाते आणि ती म्हणजे ब्लू ओशन स्ट्रॅटेजी. तुम्ही जर एखाद्या छोट्याशा तळ्यामध्ये जिथे प्रचंड मोठे मासे आहेत त्यांच्यासोबत स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही रक्तबंबाळ व्हाल आणि संपूर्ण तलाव रक्ताने भरून जाईल; पण सर तुम्ही अशा एखाद्या स्वत:च्या तळ्याची निर्मिती केली जिथे स्पर्धा कमी आहे आणि तुमच्या कौशल्याला वाव जास्त आहे तर तुम्ही देखील उद्योगात तग धरू शकता आणि स्वतःची प्रगती झपाट्याने करू शकता.
दुसरी मानसिकता म्हणजे माझ्या व्यवसायातले माझे सगळे प्रतिस्पर्धी हे एक खेळाडू आहेत.
उद्योग हा एक खेळ आहे आणि आम्ही तो एन्जॉय करत आहोत.
सगळ्यांसाठी सगळं काही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे ( Abundance).
आपल्या ऑनलाईन स्वराज्य ब्लूप्रिंट ह्या कोर्समध्ये प्रत्येकाची वेगळी पोझिशनिंग निर्माण करून उद्योग मोठा कसा करायचा आणि स्वतःचं वेगळं अस्तित्व कसं निर्माण करायचं हेच आपण शिकवतो.
५). अपयशाला न घाबरणारे (Not afraid of failure):
अपयश आणि यश या नाण्याच्या दोन बाजू आहेत. या जगात असा एकही उद्योजक नाही ज्याला कधीच अपयशाला सामोरे जावे लागले नाही. बहुदा याच कारणामुळे कित्येक लोक नोकरी करणं जास्त पसंत करतात, कारण त्यांना दर महिन्याला सातत्याने घरी येणारा पैसा जास्त महत्वाचा वाटतो. डोक्यावर कोणतीही जोखीम न घेण्याची मानसिकता त्यांना उद्योजक बनण्यापासून रोकते .
खरंतर ते अपयशाला घाबरत असतात, थोड्याश्या सुरक्षिततेसाठी आयुष्यभराचे स्वातंत्र्य गमावून बसतात.
आपण अपयशाने खचून जातो की, अपयशाचं परीक्षण करून त्यातून काहीतरी शिकून स्वतःमध्ये काही सुधारणा करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय की नाही, हा प्रश्न स्वतःला सातत्याने विचारणं खूप महत्त्वाचं आहे.
थॉमस एडिसन यांचं अतिशय प्रसिद्ध असं वाक्य ''मी ९,९९९ वेळा अपयशी झालो नाही; तर मला ९,९९९ वेळा बल्ब का पेटत नाही त्याची कारणे माहिती झालीत."
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या अपयशाकडे अशा दृष्टिकोनाने बघायला लागते तेव्हा काय होतं, ते अख्ख्या जगाला आपल्या यशाने उजळून टाकतात.
तात्पर्य काय तर जिंकण्याची मानसिकता घडवायची असेल तर आपल्याला स्वतंत्र विचार, ध्येयवादी वृत्ती, १०० टक्के जबाबदारी, सर्व काही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि अपयशाला न घाबरण्याची तयारी केली पाहिजे.
येत्या भागात आणखी पाच जबरदस्त दृष्टिकोनांबद्दल आपण चर्चा करणार आहोत, ते वाचायला विसरू नका .
ह्या ब्लॉग मध्ये विचारलेल्या प्रश्नांची मनापासून उत्तरं द्या आणि आपल्या आयुष्यात त्यांना इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा, तरच आपण जिंकण्याची मानसिकता घडवू शकू.
हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला हुरूप देतात.
तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.
सतत सकारात्मकता, सातत्य आणि जबरदस्त वातावरण मिळवण्यासाठी आपली १०००० उद्यजकांची मिशन ऑनलाईन स्वराज्य ही कम्युनिटी नक्की जॉईन करा.
चला मिलेनिअर माईंड घडवूया, ऑनलाईन स्वराज्य घडवूया, वेळेचे, पैश्याचे, निवडीचे स्वातंत्र्य मिळवूया. धन्यवाद !