नमस्कार !
आपण पहिल्या भागात ग्रोथ माइण्डसेट आणि फिक्स माइण्डसेट ह्यामधील फरक बघितला. फिक्स माइण्डसेट मधून बाहेर पडणं खूप महत्वाचे आहे आणि त्यासाठी ग्रोथ माइण्डसेट निर्माण करणं गरजेचे आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल.
आपण ग्रोथ माइण्डसेट निर्माण करण्याच्या दहा स्टेप्स बघणार होतो.
मागील ब्लॉगमध्ये (दुसऱ्या भागात) आपण ग्रोथ माइण्डसेट निर्माण करण्याच्या पहिल्या ५ स्टेप्स बघितल्या,
ह्या ५ स्टेप्स नी तुम्हाला नक्कीच ग्रोथ माइण्डसेट निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले असेल याची मला खात्री आहे.
ह्या भागात आपण पुढच्या आणि शेवटच्या ५ स्टेप्स बघणार आहोत.
चला मग सुरुवात करूया .
6. संपूर्ण जबाबदारी घ्या:
माणसाचा सर्वात मोठा दुर्गुण कोणता? असं जर तुम्हीं मला विचारलंत, तर मी तुम्हांला एकच गोष्ट सांगेन की, माणूस आपल्या यशाचं संपूर्ण क्रेडिट स्वतः घेतो आणि अपयशाचा खापर दुसऱ्यांच्या माथी फोडायला नेहमीच तयार असतो.
जर मी वेळेवर आलो तर ते माझ्यामुळे पण जर मला लेट झाला तर तो बसमुळे, पेट्रोलमुळे, एक्सीडेंट मुळे किंवा थोडक्यात इतरांमुळे.
ज्या क्षणी तुम्हीं तुमच्या आयुष्याची शंभर टक्के जबाबदारी घेता त्या क्षणाला तुम्ही कारणं देणे बंद करता. जे काही आहे ते माझ्यामुळेच आहे, इथून पुढे जे काही होणार आहे ते माझ्यामुळेच होणार आहे, अशी ग्वाही तुम्ही स्वतःला सातत्याने देता. हे झाल्यावर एक वेगळीच जादू आयुष्यात होते. अचानक तुम्हांला समस्या दिसणं बंद होतं आणि तुमचं सगळं लक्ष हे सोल्युशनवर किंवा समाधानावर केंद्रित व्हायला सुरुवात होतं.
थोडं थोडं का होईना तुम्हीं तुमच्या ध्येयाच्या दिशेने प्रगती करता आणि हीच ग्रोथ माईंडसेटची निशाणी आहे .
7. तुम्ही तिथे पोहोचू शकता हा स्वतःला विश्वास द्या:
मी जिथे कुठे पोहोचण्याचा विचार करतोय तिथे मी पोहोचू शकेन हा विश्वास जोपर्यंत अंतर्मनाला बसत नाही, तोपर्यंत त्या दिशेने कृती करायला ते कधीच तयार होत नाही.
आपण काहीतरी कृती करतोय असं आपल्याला वाटत असतं, पण आपली त्यासाठी शंभर टक्के कमिटमेंट कधीच नसते, कारण अंतर्मन तयार नसतं.
मी तिथे पोहोचू शकतो हा विश्वास तुम्हाला तीनच गोष्टी देतात
- योग्य मार्गदर्शन
- योग्य वातावरण
- योग्य नियोजन
योग्य मार्गदर्शन - वेळोवेळी तुम्हांला अशा व्यक्तींचं मार्गदर्शन मिळायला पाहिजे, ज्यांनी तुम्हीं करत असलेला प्रवास आधी केलेला आहे आणि त्या रस्त्यावरच्या खाचखळग्यांबाबत त्यांना माहिती आहे.
तुमच्या आजूबाजूला असे लोक असुद्या जे तुमच्या सारख्याच ध्येयाने प्रेरित आहेत, त्यांना देखील स्वतःच्या मानसिकतेत बदल घडवून आणून आयुष्यात यशाची उंच शिखरे गाठायची आहेत.
योग्य नियोजन - योग्य नियोजन तुम्हाला कोणत्या वेळी कुठे पोहोचायचे याची माहिती देते आणि तुमच्या ध्येयाच्या प्रवासात ध्रुवताऱ्याचे काम करते.
योग्य वातावरण - तुमची सपोर्ट सिस्टीम निर्माण करा.
तुमच्या आजूबाजूला अशी लोकं हवीत जी तुम्हांला सातत्याने विश्वास देतील की आम्हीं करू शकतो तर तू नक्की करू शकतोस.
'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात.'
वातावरणाची काळजी घ्या, तुमच्या अर्ध्या अधिक समस्या कापरासारखा उडून जातील .
नाकारत्मक गोष्टींपासून सावधपणे दूर राहा .
●वर्तमान पत्र
●न्यूज चॅनल
●नकारात्मक सोशल मीडिया
●नकारात्मक लोकं ह्यांच्यापासून जाणीवपूर्वक लांब रहा.
'मिशन ऑनलाईन स्वराज्य' १०००० पेक्षा जास्त समविचारी आणि सकारात्मक उद्योजकांची कम्युनिटी आहे. ह्या प्लॅटफॉर्म वर धार्मिक, राजकीय , घृणा निर्माण करणाऱ्या पोस्ट ना मज्जाव आहे, इथे सकारात्मक वातावरण जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो.
८. कम्फर्ट झोन सोडा- उडी घ्या:
'डर के आगे जीत है.'
बऱ्याच गोष्टी लक्षात आल्यात पण जो पर्यंत तुम्हीं भीतीवर मात करून सातत्याने स्वतःला मी माझा माइण्डसेट बदलतोय ह्याची ग्वाही देत नाही, तोपर्यंत आपलं अंतर्मन बदलण्याचं मनावर घेत नाही.
रोज एखादी गोष्ट करा ज्यामुळे
-तुमच्या अंगावर काटा येईल,
-तुम्हांला घाम फुटेल,
-तुम्हाला अजिबात आवडणार नाही, पण ते गरजेचे असेल.
अश्या सगळ्या गोष्टी करून त्या लिहून ठेवा. १५ दिवसांतून एकदा ह्या गोष्टी वाचा, स्वतःला आत्मविश्वास द्या, मी हे सगळं करू शकतो, स्वतःच्या मर्यादा ओलांडू शकतो तर मी काही करू शकतो.
ग्रोथ माइण्डसेट ची ही खरी लिटमस टेस्ट आहे.
9. सकारात्मक रहा (पॉझिटिव्ह रहा):
सकारात्मक विचाराने काही साध्य होतं की नाही हे मला माहिती नाही; पण नकारात्मक विचारांपेक्षा नक्कीच काहीतरी चांगलं होतं हे माझ्या अनुभवातून सांगू शकतो.
विचारांतून शब्द, शब्दांतून कृती, कृतीतून सवयी, सवयीतून व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्वांतून भविष्य घडत असतं. ह्या प्रवासात तुमचे विचार सकारात्मक नसतील तर पुन्हां तुम्हीं फिक्स माईंडसेटला जायला वेळ लागणार नाही.
सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी मी तुम्हांला काही सोप्या टिप्स देतो.
◆तुमच्या आयुष्यातील सगळ्या चांगल्या गोष्टींची नोंद घ्या.
◆तुमच्याकडे अशा काही दैवी देणग्या आणि टॅलेंट आहेत, जे अनमोल आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
◆तुमच्या ध्येयाने झपाटून काम करा आणि सर्वोत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यात आकर्षित करा.
◆चांगलं वाचा, चांगलं ऐका आणि चांगल्याची चर्चा करा.
आज ऑनलाईन स्वराज्यामध्ये 'जगविख्यात पुस्तकं समजून घेऊया मराठीतून' या सिरीज अंतर्गत आपण 130 पेक्षा जास्त सकारात्मक पुस्तकांची मराठीतून चर्चा केलेली आहे रोज कमीत कमी पंधरा मिनिटं अशा प्रकारच्या प्रेरणादायी गोष्टी ऐका किंवा वाचा त्यामुळे तुमचा दृष्टिकोन सकारात्मक होण्यास प्रचंड मदत होईल.
10. सतत शिकत रहा:
ह्या गोष्टीवर मी कितीही जोर देऊन बोललो तरी माझे प्रयत्न कमीच पडतील असं मला वाटतं.
गेली कित्येक वर्षे मी रोज कमीत कमी एक तास काहीतरी नवीन शिकण्याचा- वाचण्याचा प्रयत्न करतो.
माझे करिअर मी 2000 मध्ये सुरू केले आणि गेल्या 22 वर्षात जर माझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये, माझ्या करिअरमध्ये, माझ्या उत्पन्नामध्ये जर काही मोठे बदल घडले असतील तर त्याचं संपूर्ण श्रेय या एका सवयीला देतो.
माणूस हा मूलतः सृजनशील आहे आणि मानवी मन हे कम्फर्ट झोन मध्ये जाण्यासाठी मार्ग शोधत असतं.
त्या सृजनशीलतेला जिवंत ठेवून सातत्याने कम्फर्ट झोन च्या बाहेर येत राहणं हेच मानवी प्रगतीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आणि ते होण्यासाठी आपण सतत शिकत राहणं खूप महत्त्वाचं आहे.
हा ब्लॉग तुम्हांला कसा वाटला नक्की कळवा, कमेंट मधून आपली प्रतिक्रिया द्या.
तुम्हांला आणखी कोणत्या विषयावर मार्गदर्शन हवे आहे ते देखील नक्की कळवा, भविष्यात त्या विषयांवर विचार मांडायला मला नक्की आवडेल.
दिवसाची जबरदस्त सुरुवात करण्यासाठी आणि ग्रोथ माइण्डसेटसाठी आवश्यक त्या गोष्टी सातत्याने करण्यासाठी ऑनलाईन स्वराज्याचा 'सुपर मिरॅकल मॉर्निंग' हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा .
तुमच्या बहुमूल्य वेळेसाठी आणि प्रतिक्रियांसाठी मनापासून कृतज्ञता.
माइण्डसेट बदलूया , सर्वोत्तम मिळवूया !
धन्यवाद!